राजापूर:- तालुक्यातील एका तरुणीला धमकी देवून नाहक त्रास देणाऱ्या लांजा, वाकेड येथील प्रशांत महादेव भितळे या इसमाविरोधात राजापूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पीडित तरुणीने राजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीमध्ये म्हटले आहे, ती व तीची आई ऑक्टोबर महिन्यात बसने पंढरपूरला गेले होते. या बसमध्ये प्रशांत भितळे हा इसम देखील होता. या बसमधील सर्व प्रवाशांचा एक व्हॉटसअॅप ग्रुप तयार करण्यात आला होता. या ग्रुपमधील पीडित तरुणीचा मोबाईल नंबर घेऊन प्रशांत भितळे याने फोन करून करून पीडितेला ‘तू माझ्याशी लग्न करशील का? असे विचारले होते. त्यावर तिने नकार दिला होता. त्याचा राग मनात धरून प्रशांतने ती राहत असलेल्या ठिकाणी जावून तुला ठार मारेन अशी धमकी देऊन तिचा मोबाईल फोडून टाकल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी प्रशांत भितळे याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.









