डॉ. शेरखानेना दिलेल्या मेमोचा होईल गठ्ठा

डॉ. संघमित्रा फुले ;कार्यपद्धत चुकीची म्हणून कारवाई

रत्नागिरी:- कोरोना महामारीसारख्या गंभीर परिस्थितीमध्ये तत्कालीन निवासी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चंद्रकांत शेरखाने कर्तव्यात गैरहजर होते. कामाचा ताण असताना वर्ग एकचे हे अधिकारी तीन ते चार महिने परस्पर रजेवर जात होते. दीड लाख रुपये पगार असताना कोविड काळात डॉ. शेरखाने यांनी काही काम केले नाही. त्यांना मी एवढे मेमो दिले आहेत की, त्यांचा एक गठ्ठा तयार होईल. तरी त्याच्या वागण्यात बदल झाला नाही. याबाबत मी रितसर कोल्हापूर आरोग्य उपसंचालक यांना खुलासा दिला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली.  

डॉ. फुले म्हणाल्या, माझ्याविषयी तक्रार केली आहे,  परंतु मी माझी बाजू आरोग्य उपसंचालकांकडे मांडली आहे.डॉ. शेरखाने या गंभीर परिस्थितीमध्ये वर्ग एकचे अधिकारी असतानाही कर्तव्यावर हजर नव्हते. ते ३ ते ४ महिने परस्पर रजेवर जात होते. याचा मोठा परिणाम कामकाजावर होत होता. त्यांना मणक्याचा त्रास असल्याने त्यांनी कोरोना महामारीवर लक्ष ठेवा आणि अहवाल द्या. एवढीच कामे दिली होती. मात्र हजर असले तरी ते काही काम करत नव्हते. कामावर येण्याची वेळ सकाळी ९ ची असताना ते ११ वाजता यायचे. कार्यालयात पलंग असल्याने तेथेच झोपून राहायचे आणि दुपारी निघुन जायचे. गडबडीच्यावेळी एखादी व्हिसी करायला सांगितली तरी ते करायचे नाहीत. डॉ. शहा सर्व काम करत होते. त्यांना कर्तव्यात कसुर केल्याबद्धल अनेक मेमो दिले आहेत. मात्र त्यांच्या कामामध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. काम करायचे नसेल तर बदली करून घ्या, असेही त्यांना सांगितले. तरी त्यांनी ऐकले नाही. त्यांची रजा उपसंचालक मंजूर करतात. एकुणच त्यांची कार्यपद्धत चुकीची असल्याने ही कारवाई करण्यात आली. माझी बाजू मी आरोग्य उपसंचालकांकडे मांडली आहे, असे डॉ. फुले यांनी सांगितले.