Friday, August 7, 2026
spot_img
Home रत्नागिरी डॉ. कांचन मदार निलंबित; लाच घेतल्याप्रकरणी कारवाई

डॉ. कांचन मदार निलंबित; लाच घेतल्याप्रकरणी कारवाई

रत्नागिरी:- कामथे उपजिल्हा रुग्णालयात गर्भपातासाठी आवश्यक असणारे किट (गोळ्या) देण्याच्या बदल्यात गरोदर महिलेकडे ४ हजार ५०० रुपयांची लाच घेतल्याचा आरोप असलेल्या डॉ. कांचन शिरीष मदार (४८, रा. पागमळा, चिपळूण) हिच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

डॉ. मदार ही वर्ग २ अ गटातील वैद्यकीय अधिकारी असल्याने जिल्हा रुग्णालय प्रशानाकडून निलंबनाचा प्रस्ताव आरोग्य उपसंचालक यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावावर अखेर निर्णय घेण्यात आला असून मदारचे निलंबन करण्यात आले आहे.

कामथे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मदार हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३ जून रोजी सायंकाळी रंगेहाथ पकडले होते. या कारवाईने जिल्हा आरोग्य विभागासह संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

डॉ. मदार हिने तक्रारदार महिलेकडून लाचेची रक्कम तिच्या ‘एमएच ०८ एएक्स २६१८’ या क्रमांकाच्या खासगी चारचाकी वाहनात स्वीकारल्याचा. आरोप ठेवण्यात आला होता. लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचांसमक्ष तिला रंगेहाथ ताब्यात घेतले होते. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.