रत्नागिरी:- प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत आरोग्य विषयक योजना गावागावात पोहचविण्यासाठी डाटा ऑपरेटर व तालुका समन्वयकाची नोकरी देण्यात येईल. असे आमिष दाखवून त्याच्या प्रशिक्षणासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील २२५ हून अधिक युवक, युवतींकडून प्रत्येकी ५ हजार रुपये उकळून लाखो रुपयांचा गंडा घातला.
कणकवलीतील नगरवाचनालयाच्या सभागृहामध्ये बुधवारी आणि गुरुवारी हे प्रशिक्षण देण्यात आले. त्यासाठी जिल्हयाभरातील युवक आणि युवती आले होते. केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत आरोग्यविषयक माहिती गावागावत जावून पोहचवावी आणि आवश्यक डाटा गोळा करावा यासाठी डाटा ऑपरेटर तसेच तालुका स्तरावर समन्वयक अशी नोकरी दिली जाणार आहे. डाटा ऑपरेटरला १५ हजार तर समन्वयकाला २१ हजार रुपये पगार दिला जाईल. त्यासाठी प्रशिक्षण घ्यावे लागेल असे सांगत त्या मुलांकडून प्रत्येकी ५ हजार प्रमाणे पैसे घेण्यात आले.
हा प्रकार संशयास्पद असल्याचे समजताच कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी प्रशिक्षणस्थळी जाऊन संबंधित कथित अधिकाऱ्यांच्याकडे अधिकृत लेखी आदेश आहेत का? अशी विचारणा केली. मात्र त्यांच्याकडे तसे कोणतेही अधिकृत पत्र आढळले नाही. त्यामुळे हा फसवणूकीचा प्रकार असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत असून पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी केली जाईल असे सांगत त्या दोन कथित अधिकार्यांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेले. याच दोन कथित अधिकार्यांनी रत्नागिरीमध्येही १७० महिलांकडून अशाच प्रकारे पैसे घेतल्याचे उघड झाले आहे.
हा प्रकार समजताच पोलिस उपनिरीक्षक बापू खरात, महिला उपनिरीक्षक बरगे, हवालदार बावधाणे हेही त्याठिकाणी पोहचले. मुलांनी आपले पैसे परत देण्याची मागणी केली. नगराध्यक्षांनीही मुलांची फसवणूक झाल्यास खपवून घेणार नाही असा इशारा देताच त्या कथित अधिकार्यांनी ७५ मुलांचे प्रशिक्षणासाठी घेतलेले पैसे दोन दिवसात मागे देण्याचे मान्य केले. त्यानंतर पोलिस अधिकार्यांनी त्या दोन कथित अधिकार्यांना पोलिस स्टेशनला नेवून त्यांची चौकशी सुरु केली. त्यांची सखोल चौकशी करुन यामध्ये ते दोषी आढल्यास पुढील कारवाई केली असे पोलिसांनी सांगितले. यावेळी नगरसेवक अण्णा कोदे, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री उपस्थित होते.