Tuesday, June 9, 2026
spot_img
Home गुन्हेगारी ट्रान्सफॉर्मरची तोडफोड करून ३००० लिटर ऑईलची चोरी

ट्रान्सफॉर्मरची तोडफोड करून ३००० लिटर ऑईलची चोरी

लांजात आगवे येथील घटना; दीड लाखांचे नुकसान

लांजा:- लांजा तालुक्यातील आगवे येथे सुरू असलेल्या शासकीय विद्युत उपकेंद्राच्या कामाच्या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी धडक दिली. ट्रान्सफॉर्मरचे नट-बोल्ट काढून त्यातील मौल्यवान ऑईल चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले असून, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मे रोजी रात्री ११ ते १ जून रोजी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. फिर्यादी स्वप्नील सुरेश पाटकर हे एन.सी.सी. लि. कंपनीत कार्यरत आहेत. आगवे येथे कंपनीमार्फत विद्युत उपकेंद्राचे बांधकाम सुरू आहे. या कामाच्या ठिकाणी बसवलेल्या ट्रान्सफॉर्मरचे सर्व नट-बोल्ट अज्ञात चोरट्यांनी काढून ट्रान्सफॉर्मरमधील तब्बल ३००० लिटर ऑईल चोरून नेले.

या घटनेमुळे कंपनीचे १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी स्वप्नील पाटकर यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून, पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३२४(५) आणि भा.द.वि. कलम ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सरकारी मालमत्तेचे नुकसान करून चोरी करणाऱ्या या अज्ञात आरोपींचा शोध लांजा पोलीस घेत आहेत.