Thursday, August 6, 2026
spot_img
Home गुन्हेगारी टेम्पो पार्किंगच्या वादातून टिके-भाताडेवाडीत हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

टेम्पो पार्किंगच्या वादातून टिके-भाताडेवाडीत हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

रत्नागिरी:- तालुक्यातील टिके-भाताडेवाडी येथे टेम्पो पार्किंगसाठी रिव्हर्स घेताना मोटारीला धडक लागल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही बाजूंचे दोघेजण जखमी झाले असून, ग्रामीण पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारींवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही घटना सोमवारी (ता. ३) सायंकाळी सुमारे सव्वा सात वाजण्याच्या सुमारास टिके येथील भाताडेवाडी अंतर्गत रस्त्यावर सर्वेश भाताडे यांच्या घराजवळील पार्किंगच्या ठिकाणी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश चंद्रकांत गोताड (वय ३१, रा. टिके-भाताडेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, ते त्यांचा टेम्पो (एमएच-०८ बीके-१६४७) पार्किंगसाठी रिव्हर्स घेत असताना सर्वेश भाताडे यांच्या मोटारीला किरकोळ धडक लागली. याचा राग मनात धरून सर्वेश भाताडे, गजानन भाताडे, यतीन भाताडे, सुहास भाताडे व अथर्व भाताडे (पूर्ण नाव माहित नाही) यांनी कोणत्यातरी वस्तूने त्यांना मारहाण करून दुखापत केली. या मारहाणीत आकाश गोताड जखमी झाले.

दुसरीकडे, यतीन कृष्णा भाताडे (वय ३८, रा. टिके-भाताडेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा भाऊ सर्वेश कृष्णा भाताडे व चुलत भाऊ सुहास गोपाळ भाताडे हे त्यांच्या ताब्यातील बोलेरो मोटार उभी करत असताना आकाश गोताड याने टेम्पो रिव्हर्स घेत त्यांच्या वाहनाला धडक दिली. याबाबत जाब विचारला असता आकाश गोताड याने हातातील लोखंडी टॉमीने प्रथम सुहास भाताडे यांच्या पाठीवर व डाव्या हातावर वार केला. त्यानंतर सुहास यांना वाचविण्यासाठी मध्ये गेलेल्या यतीन भाताडे यांच्या कपाळावर व उजव्या हातावरही टॉमीने मारून दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेत यतीन भाताडे जखमी झाले. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन्ही पक्षांच्या तक्रारींवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.