Sunday, July 26, 2026
spot_img
Home संगमेश्वर झायलो गाडीच्या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू; ८ जण जखमी

झायलो गाडीच्या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू; ८ जण जखमी

आरवली येथील घटना; अडीच महिन्यांनी अपघाताचा गुन्हा दाखल

संगमेश्वर:- मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे भरधाव झायलो गाडी पलटी होऊन किंवा झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात एका लहान मुलासह आठ जण गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी मृत चालकाविरुद्धच संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही दुर्घटना ७ मे रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली असून, यासंदर्भातील गुन्हा २३ जुलै रोजी दुपारी २ वाजता नोंदवण्यात आला. भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) व मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे दीपक नारायण पवार (वय ५१ वर्षे, व्यवसाय: नोकरी, रा. माऊली अपार्टमेन्ट, परेल, मुंबई) यांच्या फिर्यादीने गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी चालक रोहित चांदणे हा आपली झायलो गाडी (क्रमांक MH-43 AB 2332) ही मुंबई-गोवा महामार्गावरून परेल ते हर्चे बेनी (ता. लांजा) अशी चालवून नेत होता. आरवली येथे आला असता, त्याने आपली गाडी अत्यंत हयगयीने, अविचाराने आणि बेदरकारपणे चालवली. यामुळे झालेल्या भीषण अपघातात चालकाचा स्वतःचा मृत्यू झाला, तर गाडीतील दीपक नारायण पवार (वय ५१ वर्षे), ज्योती दीपक पवार (वय ४६ वर्षे), समर्थ दीपक पवार (वय १ वर्ष), दीपक सदाशिव सर्वे, सौ. दीप्ती दीपक सर्वे, धनश्री दीपक सर्वे (वय १६ वर्षे, सर्व रा. माऊली अपार्टमेन्ट, परेल, मुंबई), श्रीमती दिपाली दत्ताराम चांदणे (वय ५८ वर्षे), हर्षाली रोहित चांदणे (वय ५ वर्षे, दोघेही रा. साईनाथनगर, नालासोपारा, जि. पालघर) हे गंभीर जखमी झाले.

​ संगमेश्वर पोलीस ठाणे अपघात रजिस्टर नंबर २९/२०२६ मधील तपासाअंती उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास संगमेश्वर पोलीस करीत आहेत.