रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार आणि अतिमुसळधार पावसामुळे अवघ्या ७ दिवसांत जून महिन्यातील पावसाची मोठी तूट भरून निघाली आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे जिल्ह्यातील नद्या आणि धरणांमधील पाणी पातळी खालावली होती, ज्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, जुलैच्या पहिल्या दिवसापासूनच सुरू झालेल्या दमदार पावसामुळे १ जून ते ७ जुलै या कालावधीत जिल्ह्यात सरासरी १ हजार २१९.७१ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, हे प्रमाण गतवर्षीच्या याच कालावधीतील पावसाच्या तुलनेत जवळपास ३६ टक्के इतके आहे.
यंदाच्या मान्सूनच्या प्रवासाचा विचार केला तर, मान्सूनपूर्व पाऊस वेळेवर दाखल झाला होता. परंतु, जून महिन्याच्या सुरुवातीला केवळ तीन ते चार दिवसच पाऊस पडला आणि त्यानंतर पावसाने मोठी दडी मारली. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सलग तीन दिवस पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आणि दुबार पेरणीचे संकट टळले असले, तरी गतवर्षीच्या तुलनेत जून महिन्यात तब्बल ३१ टक्के पावसाची तूट होती. ही तूट जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या पहिल्या ७ दिवसांत झालेल्या धुआंधार बरसातीने पूर्णपणे भरून काढली आहे.
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये १ जून ते ७ जुलै या कालावधीत 10 हजार 178 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. मंडणगड तालुक्यात 1 हजार 515 मिमी, दापोली 1 हजार 447 मिमी, खेड 1 हजार 210 मिमी, गुहागर 1 हजार 159 मिमी, चिपळूण 1 हजार 165 मिमी, संगमेश्वर 1 हजार 10 मिमी, रत्नागिरी 1 हजार 170 मिमी, लांजा 1 हजार 51 मिमी, आणि राजापूर तालुक्यात आतापर्यंत 1 हजार 167 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात धो धो कोसळलेल्या पावसाने जून महिन्यातील तूट भरून काढत गतवर्षीची सरासरी देखील गाठली आहे.यावर्षी पावसाची सरासरी 1 हजार 219 इतकी तर गतवर्षी 1 घर 257 च्या सरासरीने पावसाची नोंद करण्यात आली होती.
जिल्हा टँकरमुक्तीच्या मार्गावर
जून महिन्यात जिल्ह्यात पाऊस नसल्याने तब्बल १८ टँकर सुरू करावे लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि टंचाईचे प्रमाण वाढण्याची शक्यता होती. मात्र, जून आणि जुलै महिन्यातील दमदार पावसामुळे पाणीटंचाई दूर झाली असून तब्बल १७ टँकर बंद करण्यात आले आहेत. सध्या केवळ संगमेश्वर तालुक्यातील ९ गावांमध्ये एका टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, लवकरच संपूर्ण जिल्हा टँकरमुक्त होणार आहे.
पावसाचा जोर वाढल्याने शेतीकामांना कमालीचा वेग आला आहे. जिल्ह्यातील लांजा, संगमेश्वर, देवरुख आणि रत्नागिरी तालुक्यासह विविध भागांत भात लावणीच्या कामांनी गती घेतली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर भाताची पुनर्लागण पूर्ण झाली असून, येत्या काही दिवसांत असाच पाऊस राहिल्यास भात लावणीची कामे शंभर टक्के पूर्ण होतील.









