दापोली, खेड, लांजा तालुक्यात तीव्र टंचाई
रत्नागिरी:- जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढत असतानाच जिल्ह्यातील लघु आणि मध्यम पाटबंधारे प्रकल्पांमधील पाणीसाठ्याने तळ गाठायला सुरुवात केली असून, ३० एप्रिलच्या आकडेवारीनुसार जिल्ह्याचा एकूण पाणीसाठा ४३.५९ टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा ५१.२५ टक्के इतका होता. म्हणजेच यंदा तापमान अधिकच वाढल्याने पाणीसाठ्यात तब्बल आठ टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे मे महिन्यात टंचाईची झळ अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रत्नागिरी पाटबंधारे मंडळाने दिलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यातील एकूण ४९ धरणांची प्रकल्पीय क्षमता ४१९.१९३ दलघमी असून, सध्या त्यात केवळ १८२.७३० दलघमी उपयुक्त साठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी दापोली, खेड आणि लांजा तालुक्यात पाणीसाठ्याची टक्केवारी सरासरीपेक्षा कमी आहे, तर जिल्ह्यातील महत्त्वाच्या धरणांमध्येही गेल्या वर्षीच्या तुलनेत घट दिसून येत आहे. विशेषतः ‘गडनदी’ या सर्वात मोठ्या प्रकल्पात ६२.४९ टक्के साठा असून, गेल्या वर्षी तो ७७.७० टक्के होता. तीन मध्यम धरण प्रकल्पांमध्ये मात्र गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा आहे.
१५ एप्रिल २०२६ पर्यंत यावर्षीचा पाणीसाठा गेल्या वर्षीच्या पाणीसाठ्चापेक्षा अधिक होता. मात्र, गेल्या १५ दिवसांत तापमानात झालेल्या वाढीमुळे बाष्पीभवन वाढल्यामुळे पाण्याची पातळीत घट होऊ लागली आहे. दक्षिण रत्नागिरीच्या तुलनेत मध्य आणि उत्तर रत्नागिरीत पाणीसाठ्याची पातळी अधिक वेगाने खाली जात आहे. आगामी महिनाभरात पाण्याचा उपसा आणि बाष्पीभवन वाढल्यास भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल अशी शक्यता आहे.
रत्नागिरी शहर आणि परिसराला एकमेव शीळ धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या या धरणात १.१४७ दलघमी (३४.३८ टक्के) पाणीसाठा आहे. १.१५८ दलघमी उपयुक्त पाणीसाठा (३४.७२ टक्के) होता. गेल्या वर्षी नगर परिषदेने १५ एप्रिलपासून एक दिवस आड पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केली होती. यंदा १५ मेनंतर पाणीकपात करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.









