चार महिन्यांच्या कारवाईत ६० हजारांचा दंड!
रत्नागिरी:- जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्न व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांचे धाबे अन्न आणि औषध प्रशासन विभागाने पार उडवून दिले आहेत. सहाय्यक आयुक्त ललित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मार्च महिन्यापासून तब्बल १५१ ठिकाणी अचानक छापेमारी केली. या झाडाझडतीत अन्न सुरक्षेचा बोजवारा उडाल्याचे समोर आले असून, अस्वच्छता बाळगणाऱ्या ३२ जणांना तातडीने सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच १५ आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारत ६० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यामध्ये शिवाजीनगर येथील एका प्रसिद्ध बिर्याणी सेंटरला अस्वच्छतेप्रकरणी १३ हजार रुपयांचा दणका दंड बसला आहे.
ल्
रत्नागिरीतील मिठाई प्रेमींच्या आरोग्यासाठी प्रशासनाने अत्यंत कडक नियमावली लागू केली आहे. यापुढे जिल्ह्यातील सर्व स्वीट मार्ट चालकांना विक्रीसाठी ठेवलेल्या प्रत्येक मिठाईच्या डब्यावर किंवा ट्रेवर ‘उत्पादन तारीख’ आणि ‘एक्स्पायरी तारीख’ दर्शवणारे लेबल लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड दमच प्रशासनाने दिला आहे.
केवळ अन्नच नव्हे, तर जिल्ह्यात फोफावलेल्या अवैध गुटखा विक्रीवरही एफडीएने जोरदार प्रहार केला आहे. एप्रिल महिन्यापासून राबवलेल्या विशेष मोहिमेत अन्न प्रशासनाने स्वतंत्रपणे ६ मोठ्या कारवाया करत ६ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. तर पोलीस आणि अन्न प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत आणखी ६ लाखांचा माल हस्तगत करण्यात आला. अशा प्रकारे तब्बल १२ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात यश आले आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड न करता, शाळांमध्ये पोषण आहार तयार करताना २०२० च्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचा आहार सुरक्षित आणि दर्जेदार राहावा यासाठी शिक्षक व आहार चालकांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिरे घेण्यात आली आहेत. शाळांमधील रसोईघर, अन्न शिजवण्याची जागा आणि धान्याची स्वच्छता यावर आता एफडीएची ‘स्पेशल नजर’ असणार आहे.
अन्न सुरक्षा निरीक्षक तृप्ती घरत यांनी सर्व अन्न आस्थापनांना परिसरात चोख स्वच्छता राखण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. तसेच शाळांच्या आसपासच्या परिसरात तेलकट आणि अस्वच्छ खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कडक नजर ठेवली जाणार आहे. प्रशासनाच्या या धडक मोहीमेमुळे जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक, खानावळ चालक आणि अन्न व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.









