रत्नागिरी:- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका राज्याच्या अन्य भागांप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यालाही बसला असून एप्रिल महिन्यात नवीन बाधित रुग्णांच्या संख्येने दहा हजारांचा टप्पा पार केला आहे.
गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या काही हजारांपर्यंत मर्यादित राहिली होती. पण गेल्या मार्चपासून ही संख्या हळूहळू वाढू लागली आणि एप्रिल महिन्यात नवीन विक्रम प्रस्थापित केला.
या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८ एप्रिलपर्यंत नवीन बाधितांची संख्या दररोज सुमारे १०० ते १५० ने वाढत होती. पण ९ एप्रिल रोजी ती एकदम सुमारे शंभराने वाढून २५१ झाली. त्यानंतर जेमतेम ४ दिवस ती २०० ते २५० पर्यंत मर्यादित राहिली. पण १३ व १४ एप्रिल रोजी ३००च्यापुढे गेली आणि १५ एप्रिलला तर ४०० चा टप्पा (४१७) ओलांडला. त्यापुढील तीन दिवस वेगाने ही संख्या पाचशेवर (१८ एप्रिल – ५५५) गेली. १९ एप्रिल रोजी त्यामध्ये तात्पुरती घट (२५९) दिसली, पण दुसऱ्याच दिवशी (२० एप्रिल) हा आकडा सहाशेवर (६८५) पोचला. त्यानंतरचे चार दिवस जिल्ह्यात दररोज ४५० ते ५५० करोनाबाधित रुग्ण आढळून येत होते. २५ एप्रिल रोजी तो पुन्हा सहाशेवर (६१५) गेला. त्यानंतर एक दिवस वगळता जिल्ह्यात दररोज सहाशेपेक्षा जास्त बाधित रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या बुधवारी तर तब्बल ७९१ रुग्ण सापडल्याने दैनंदिन आकडेवारीचा नवा उच्चांक गाठला गेला आणि त्याचबरोबर अवघ्या २८ दिवसात जिल्ह्यात नवीन १० हजार कोरोनाबाधित रुग्ण (१०,०४०) नोंदले गेले.









