भरपाईची रक्कम खात्यात जमा, शेतकरी वर्ग समाधानी
रत्नागिरी:- ऑक्टोबर महिन्यात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलेल्या २० हजार ८११ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आता थेट नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे. एकूण ३ कोटी ६६ लाख ८२ हजार रुपयांच्या निधी वाटपास प्रशासनाने पूर्णत्व दिले आहे.
यंदा जिल्ह्यात पावसाने सुरुवातीला दमदार हजेरी लावल्यामुळे भात आणि नाचणीचे पीक जोमात होते. मात्र, कापणीच्या ऐन हंगामातच अवकाळी पावसाने घात केला. अनेक ठिकाणी उभे पीक आडवे झाले, तर काही ठिकाणी भाताला मोड फुटले. यामुळे शेतकरी पूर्णपणे खचला होता. या संकटाची दखल घेत कृषी विभागाने तातडीने ३ हजार ९५० हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले होते.
जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यांमध्ये पावसाचा तडाखा बसला होता, मात्र काही तालुक्यांना याचा सर्वाधिक फटका बसला. सर्वाधिक नुकसान खेड, संगमेश्वर, चिपळूण, दापोली आणि लांजा तालुक्यात झाल्याची नोंद करण्यात आली होती. गुहागर आणि राजापूर तालुक्यांमध्ये तुलनेने कमी नुकसान झाले होते.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार, शासनाकडून मंजूर झालेला निधी टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. यामुळे खरिपाचे पीक गेल्यामुळे हवालदिल झालेल्या बळीराजाला आता मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भात पिकाच्या नुकसानीचा प्रस्ताव कृषी विभागाकडून शासनाकडे पाठवला होता. मंजूर झालेले ३ कोटी ६६ लाख ८२ हजार रुपये आता जिल्ह्यातील २० हजार ८११ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी दिली.









