जिल्ह्यातील हॉटेल्स आता रात्री बारापर्यंत सुरू ठेवण्याची मुभा

रत्नागिरी:-जिल्ह्यातील हॉटेल आता रात्री १२ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ बी. एन. पाटील यांनी काढले आहेत.

यापूर्वी दिनांक १ फेब्रुवारी रोजी काढलेल्या आदेशात सर्व स्तरावर कोव्हीड निर्बंधातून शिथिलता देण्यात आली होती मात्र रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत हॉटेल बंद ठेवण्याचे आदेशात नमूद करण्यात आले होते. प्रशासनाच्या या निर्णयाबाबत हॉटेल व्यवसायिकांनी नाराजी व्यक्त केली होती. याबाबत रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनने दिनांक ४ फेब्रुवारी रोजी एक लेखी निवेदन देखील दिले होते. नव्याने सुरु होणारी पर्यटनस्थळे, शाळा, व्यापार यांचा विचार करता हॉटेल साठी रात्री १० पर्यंतची वेळ गैरसोयीची आहे. याचा फटका हॉटेल व्यवसायाला बसत असल्याचे निवेदन हॉटेल असोसिएशन कडून जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते.

हॉटेल व्यवसायिकांची हि अडचण ओळखून आज जिल्हाधिकारी यांनी नवीन आदेश काढले असून याद्वारे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व रेस्टॉरंट व उपहारगृह दररोज रात्री १२ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर यांच्या पाठपुराव्याला यश

रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनकडून करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. जिल्ह्यातील रेस्टॉरंट, हॉटेल्सची वेळ वाढवून मिळावी यासाठी हॉटेल असोसिएशनकडून ना. सामंत आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर यांनी याबाबत ना. सामंत यांच्याकडे चर्चा केली होती. या चर्चेनंतर ना. सामंत जिल्हा प्रशासनाला दिलेल्या सुचनेनंतर जिल्ह्यातील रेस्टॉरंट आणि हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येतील असे आदेश जिल्हा प्रशासनाने बुधवारी काढले.