उद्योजकांना मिळणार बंपर सवलती
रत्नागिरी:- जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात आता एक सुवर्ण अध्याय सुरू झाला आहे. रत्नागिरी एमआयडीसीचा दर्जा ‘क’ वर्गावरून थेट ‘ड प्लस’ वर्गात समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे येथील उद्योजकांसाठी प्रगतीची नवी कवाडे उघडली आहेत. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
या महत्त्वपूर्ण बदलामुळे गडचिरोलीसारख्या विशेष औद्योगिक क्षेत्रांना मिळणाऱ्या सर्व सवलती आणि सुविधा आता रत्नागिरीतील उद्योजकांना सहज उपलब्ध होत आहेत. बँक कर्ज आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ विनाव्यत्यय मिळेल.
मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात एकापाठोपाठ एक प्रकल्प प्रत्यक्षात येत आहेत. लोटे परशुराम परिसरासह जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये नव्या उद्योगांची मोठी भर पडली आहे. या सर्व प्रकल्पांमुळे कोकणात रोजगाराच्या हजारो नवीन संधी निर्माण होत आहेत.
उद्योजकांना होणार फायदे…
रत्नागिरी एमआयडीसी ‘क’ वर्गावरून ‘ड प्लस’मध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे गडचिरोलीच्या धर्तीवर उद्योजकांना विशेष सवलती आणि सोप्या पद्धतीने बँक कर्ज मिळणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी रेड कार्पेट अंथरले जाणार आहे.









