जिल्हा बहुआपत्तीप्रवण; पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज रहा: जिल्हाधिकारी

रत्नागिरी:-रत्नागिरी हा बहुआपत्तीप्रवण जिल्हा आहे.  चक्रीवादळ, अतिवृष्टी, दरड कोसळणे यांसारख्या आपत्तीचा प्रभाव प्रामुख्याने जिल्ह्यामध्ये आढळतो.  त्यामुळे या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी सज्ज रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील बैठकीमध्ये केले.

मान्सून पूर्व तयारी 2022 आढावा बैठक आज जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी  कार्यालय सभागृहात संपन्न झाली. बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगले, पाटबंधारे विभागाच्या अधिक्षक अभियंता श्रीमती नारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण, सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय श्री. भादुले तसेच जिल्ह्यातील नगरपालिकांचे मुख्याधिकारी, सर्व तहसिलदार, उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. 

गेल्यावर्षी चिपळूण तालुक्यात अतिवृष्टी, पोसरे, बीरमणी व पेढे या गावांमध्ये दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. अतिवृष्टी होणाऱ्या नदी व खाडीकिनाऱ्याजवळील गावांमध्ये  मान्सूनच्या कालावधीत सर्तकता बाळगणे आवश्यक आहे त्याकरीता संबंधित विभागांनी आराखडा तयार करुन त्याची योग्य अंमलबजावणी करावी, असे त्यांनी बैठकीत सांगितले.

 यावेळी सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग, पाटबंधारे, वन, महसूल, मत्स्यविभाग, कृषि विभाग, महावितरण या विभागांनी मान्सूनच्या पूर्वी आपल्या विभागांशी संबंधित कामे पूर्ण करावीत.  पाटबंधारे विभागाने धरणांची बांधकाम तपासणी करुन धरण दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत.  सार्वजनिक बांधकाम व जि.प. बांधकाम विभागाने रस्त्यांची व साईड पट्टयांची दुरुस्ती करावी.  नदीवरील साकव, छोटे पूल नादुरुस्त असल्यास त्यांची दुरुस्तीही करुन घ्यावी.  राष्ट्रीय महामार्ग विभागाने मुंबई-गोवा व रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील घाटांची पाहणी करुन दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत.  सर्व प्रमुख घाटांमध्ये जेसीबी, पोकलेन, डंपर ची व्यवस्था करावी.  ज्या ठिकाणी आवश्यकता असेल अशा ठिकाणी शोध आणि बचाव कार्यासाठी पाणी उपसण्याकरीता पंप, जनरेटर्स, बुलडोजर्स, बोट इत्यादी साहित्य उपलब्ध ठेवावे. पूर परिस्थितीमध्ये स्थलांकरीत करण्यात येणाऱ्या नागरिकांकरीता तात्पुरते निवारा केंद्र उभारणीसाठी संबंधित नगरपरिषद व उपविभागीय अधिकारी यांनी जागा निश्चित करुन सदर ठिकाणी नागरिकांना मुलभूत सोयी उपलब्ध होतील याचे नियोजन करावे. दरडप्रवण क्षेत्रातील गावांना संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी भेट देवून स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहाय्याने ग्रामस्थांना बचावकार्यासाठी प्रशिक्षण द्यावे.  महावितरण विभागाने मान्सून काळात विद्युत पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी.  अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी संबंधित विभागांना दिल्या.

बैठकीला महावितरण, बीएसएनएल, वनविभाग, जलसंधारण, कोकण रेल्वे, होमगार्ड, एस.टी. महामंडळ, पत्तन विभाग, कृषि विभाग, आरोग्य विभाग आदी विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.