प्रवासी जखमी, मोठा अनर्थ टळला
रत्नागिरी:- शहरातील पावस मार्गावर जिल्हा न्यायालयाच्या समोर सोमवारी सकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास एसटी बसचा अत्यंत भीषण अपघात घडला. वायंगणी येथून रत्नागिरी शहराच्या दिशेने येणाऱ्या शहर बस वाहतुकीच्या एसटी चालकाला अचानक डुलकी लागल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव बस रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या सिमेंटच्या महाकाय पाईपवर जाऊन जोरात आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की बसच्या समोरील काचा फुटून रस्त्यावर विखुरल्या. या अपघातात बसमधील काही प्रवाशांना दुखापती झाल्या असून, वेळेत बस अडकल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी न होता संभाव्य मोठा अनर्थ टळला आहे.
सकाळच्या सुमारास ही बस शहराकडे येत असल्याने यामध्ये शाळा आणि कॉलेजमध्ये जाणारे अनेक विद्यार्थी तसेच कामानिमित्त रत्नागिरी शहरात येणाऱ्या नोकरदारांची मोठी गर्दी होती. प्रवास सुरू असतानाच अचानक घडलेल्या या भीषण धडकेमुळे आणि जोरदार आवाजामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट उडून भीतीचे वातावरण पसरले. अपघाताचा मोठा आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील नागरिक तातडीने मदतीसाठी रस्त्यावर धावून आले. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तत्परता दाखवत जखमी प्रवाशांना बाहेर काढून प्राथमिक उपचारांसाठी हलवले.
या अपघातानंतर पावस रोड परिसरात काही काळ प्रवाशांचा मोठा गोंधळ उडाला आणि वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला होता. घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आणि रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुरळीत केली. या भीषण अपघातामुळे चालक व प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, चालकाच्या निष्काळजीपणाबाबत रत्नागिरी शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.









