रत्नागिरी:- लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अतिप्रसंग केल्या प्रकरणातील संशयिताने जामिनावर सुटका झालेली असताना जामीन अर्जातील अटी आणि शर्थीचा भंग करून पीडितेला फोन व मेसेज करत धमकावले. या प्रकरणी न्यायालयाने सोमवारी संशयिताचा जामीन रद्द करत त्याची रत्नागिरी विशेष कारागृहात रवानगी केली.
महेश शांताराम बालगुडे (३८, रा. वाकवली दापोली, रत्नागिरी) असे जामीन रद्द करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पीडितेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
त्यानुसार, पीडिता ही नोकरीनिमित्त माळनाका परिसरात भाड्याने रहात असताना १२ एप्रिल २०२३ रोजी संशयित महेशने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. त्यानंतर संशयित हा पीडितेच्या रूमवर आला असता त्याने पीडितेशी बोलताना तिचा आपल्या मोबाईलमधील आक्षेपार्ह फोटो दाखवला. पीडितेने तो फोटा महेशला डिलिट करण्यास सांगितले परंतु, त्याने तो फोटो डिलिट केला नव्हता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने याबाबत रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी महेश बालगुडे विरोधात भादंवि कायदा कलम ३७६, ३७६ (२) (एन) अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. या प्रकरणी न्यायालयाने संशयिताला पोलिस कोठडी सुनावल्यानंतर तो न्यायालयीन कोठडीत असताना त्याचा जामिन मंजूर केला होता. परंतु जामिनावर सुटका झाल्यावर संशयित महेश बालगुडेने पीडितेला फोन व मेसेज करून धमकी दिली होती. या प्रकरणी पीडितेने पुन्हा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या बाबत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांकडे संशयिताचा जामीन रद्द करण्यात यावा असा अर्ज केला होता. या अर्जाचा विचार करून न्यायालयाने सोमवारी महेश बालगुडेचा जामीन रद्द करून त्याची रत्नागिरी विशेष कारागृहात रवानगी केली आहे.