रत्नागिरी:-/फिर्यादी आणि साक्षीदार यांच्या घरगुती वादात कोणतेही कारण नसताना चार जणांनी जातीवाचक शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली . ही घटना २९ ते ३० मार्च २०२३ रोजी सायंकाळी ७.३० ते ८ वा . कालावधीत जाकादेवी येथे घडली असून ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरुवारी तक्रार देण्यात आली आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक देसाई , सुधीर देसाई , बंड्या देसाई आणि दत्ता देसाई अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार संशयितांची नावे आहेत . त्यांच्याविरोधात फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीनुसार , फिर्यादी आणि साक्षीदार ( पोलिसांनी नावे जाहीर केलेली नाहीत ) यांच्यात घरगुती कारणातून वाद सुरू आहे . २९ मार्च रोजी त्यांच्यात वाद सुरु असताना संशयितांनी त्याठिकाणी येऊन फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तुम्ही जाकादेवी येथे राहू शकत नाही . आताच्या आता घर खाली करा , अशी फिर्यादींना धमकी दिली . त्यानंतर प्रतीक देसाईने तुझ्या विरोधात खोटी विनयभंगाची तक्रार देऊन तुला जेलमध्ये टाकेन , असे बोलून फिर्यादी बाहेर जात असताना त्यांच्या गाडीभोवती चिरे लावले . तेव्हा फिर्यादीची आई याबाबत संशतियांना जाब विचारण्यासाठी गेली असता , दत्ता देसाईने तुमच्या मुलाला आम्हाला ठार मारायचे आहे तोपर्यंत गाडी आमच्याच ताब्यात राहील , असे सांगितले . तसेच तुमची जाकादेवीत राहण्याची लायकी नसून तू येथे राहिलीस तर तुला रॉकेल टाकून पेटवून देऊ , असे सांगितले . सायंकाळी ७ ते ८ वा . दरम्यान संशयितांनी फिर्यादी व साक्षीदार यांना जाकादेवी येथे बोलावून ठार मारण्याची धमकी देत खोटा माफीनामा लिहून घेतला .