९६०० कोटी खर्चून द्रुतगती महामार्गाची निर्मिती
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचे जयगड बंदर पश्चिम महाराष्ट्रातील सातार्याशी जोडण्यात येणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) जयगड बंदर- चिपळूण- सातारा असा ९८ किमीचा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावित महामार्गामुळे कोकण, जयगड बंदर आणि पश्चिम महाराष्ट्र थेट जोडला जाणार आहे.
यामुळे राज्यातील प्रमुख औद्योगिक, कृषी आणि व्यापारी केंद्रांमधून बंदरापर्यंतची मालवाहतूक सुकर आणि अतिजलद होणार आहे. जयगड बंदर ते सातारा अंतर साडेपाच तास ते सहा तासांऐवजी अवघ्या एका तासात पार करता येणार आहे.
कोकणातील जयगड बंदराला पश्चिम महाराष्ट्राशी जोडण्यासाठी ९८ किमीचा द्रुतगती महामार्ग प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती एनएचएआयमधील वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.
चार जिल्ह्यांना फायदा
जयगड बंदर – चिपळूण – सातारा (राष्ट्रीय महामार्ग-४८) असा हा महामार्ग आहे. यासाठी अंदाजे ९६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. चिपळूण, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांना हा महामार्ग जोडणार आहे.
आराखडा तयार करणार
याचा सविस्तर आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे. लवकरच सल्लागाराची नियुक्ती करून आराखडा तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.
गुंतवणुकीला चालना
प्रस्तावित ९८ किमीच्या महामार्गामुळे लॉजिस्टिक कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील आर्थिक विकासाला चालना मिळेल. तसेच प्रादेशिक आर्थिक विकास, रोजगारनिर्मिती आणि गुंतवणुकीलाही चालना मिळेल, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त होत आहे.









