Thursday, July 30, 2026
spot_img
Home रत्नागिरी जयगड खाडी किनारी आढळला प्रौढाचा मृतदेह

जयगड खाडी किनारी आढळला प्रौढाचा मृतदेह

आंबेरे खुर्द येथील इसम; आकस्मिक मृत्यूची नोंद

रत्नागिरी:- गुहागर तालुक्यातील आंबेरे खुर्द बौद्धवाडी येथील जयगड खाडीच्या किनारी असलेल्या खडकामध्ये एका ५६ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याची दुर्घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत घरात वाद घालून निघून गेलेल्या या इसमाचा मृतदेह खाडीकिनारी मिळाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २५ जुलै रोजी रात्री ९ वाजल्यापासून ते २७ जुलै रोजी दुपारी ४.१७ वाजेच्या दरम्यान आंबेरे खुर्द बौद्धवाडी येथील जयगड खाडीच्या किनारी घडली. या प्रकरणाची नोंद २७ जुलै रोजी सायंकाळी ५.३३ वाजता गुहागर पोलीस ठाण्यात करण्यात आली.
मृत इसमाचे नाव प्रदीप शिवराम गमरे (वय ५६, रा. आंबेरे खुर्द बौद्धवाडी, ता. गुहागर) असे आहे.

प्रदीप गमरे हे दारू पिवून घरात विनाकारण वाद करत असत. घटनेच्या दिवशीही त्यांनी घरात वाद घातला आणि ते घरातून निघून गेले. त्यानंतर ते बऱ्याच वेळेपर्यंत घरी परत आले नाहीत. त्यामुळे त्यांची शोधाशोध सुरू झाली.

फिर्यादी पंकज प्रदीप गमरे तसेच वाडीतील ग्रामस्थ एकत्र येऊन त्यांचा गावात आणि परिसरात शोध घेत होते. शोध घेत असताना आंबेरे खुर्द बौद्धवाडी येथील जयगड खाडीच्या किनारी असलेल्या खडकामध्ये प्रदीप गमरे यांचा मृतदेह संशयास्पद व मृत अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.