रत्नागिरी:-जिल्ह्यात मागील 48 तासांपासून पडणार्या मुसळधार पावसात बुधवारी रात्रीच्या सुमारास जयगड कळझोंडी येथील दोन वाड्यांना जोडणार्या पुलाचा काही भाग कोसळला आहे. पुलाचा एक पिलर कोसळला असून पूल धोकादायक अवस्थेत उभा आहे. पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे जवळच असलेल्या दुमजली घराला तडे गेले आहेत. या घरातील कुटुंबाला सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
मागील तीन दिवस रत्नागिरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे नद्या नाले भरून वाहू लागले असून पाणी पात्राबाहेर आले आहे. अनेक भागात तर पूर आला आहे. किनारी भागातील लोकवस्तीला धोका निर्माण झाला आहे. गुरुवारी सकाळी पावसाचा जोर ओसरला असला तरी पूरस्थिती काही भागात कायम आहे. तीन दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसाचा तडाखा जयगड येथील कळझोंडी येथील पुलाला बसला. पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे तालुक्यातील कळझोंडी गणसुरे वाडीकडे जाणारा पुलाचा एक पिलर पूर्णतः कोसळला आहे. याठिकाणी वाहणार्या छोट्या नदीच्या पुरामुळे पिलर ढसाळला असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या पुलावरील रस्त्यावर एक मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा प्रकार काल रात्री घडला.
या पुलाच्या शेजारी असणार्या एका दुमजली घराला तडे गेले असून सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत हे घर आहे. रात्रीच्या सुमारास घराला तडे जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या घरातील कुटुंबाला तात्काळ दुसरीकडे हलवण्यात आले आहे. मुख्य मार्गाकडे जाण्यासाठी येथील लोकांना हा पूल उपयुक्त होता. आता या ग्रामस्थांना खंडाळा मार्गे सुमारे 6 किलोमीटरचा वळसा पडणार आहे. प्रशासनानं घटनास्थळाची पाहणी केली आहे. स्थानिक जिल्हा परिषद सदस्य यांनीही घटनास्थळाला भेट दिली.
दरम्यान, मागील वर्षीच हा पूल खचला होता त्यावेळी जिल्हा परिषदेने तात्पुरती डागडुजी केली होती. मात्र याकडे बांधकाम खात्याने गांभीर्याने न बघितल्याने आज ही परिस्थती ओढवली आहे असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.








