संगमेश्वर:- तालुक्यातील शिवधामापूर, भेलेवाडी येथे जमीनीच्या मोजणीदरम्यान झालेल्या वादातून एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सात जणांविरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २५ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. देविदास बचन महाडीक (वय ५४, सध्या रा. शिंदे चाळ, पाग नाका, चिपळूण, मूळ रा. शिवधामापूर, भेलेवाडी) यांनी यासंदर्भात फिर्याद नोंदवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संभाजी पांडुरंग महाडीक, उमेश संभाजी महाडीक, अमेय संभाजी महाडीक, सदाकर गणपत महाडीक, राजाराम बाबी महाडीक, राजेंद्र शिवराम खेडेकर आणि रुपेश राजेंद्र खेडेकर (सर्व रा. शिवधामापूर, भेलेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी देविदास महाडीक यांच्या घराशेजारी राहणारे आरोपी क्रमांक १ संभाजी महाडीक यांच्या मालकीच्या गट क्रमांक १६६/३ या जमीनीची मोजणी २५ एप्रिल रोजी सुरू होती. फिर्यादी आणि त्यांच्या बहिणी या जमीनीचे लगतचे हिस्सेदार असल्याने, त्यांना मोजणीची नोटीस मिळाली नव्हती. त्यामुळे फिर्यादी आणि साक्षीदार यांनी मोजणी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली की नोटीसमध्ये त्यांच्या चुलत्याचे नाव आहे, परंतु त्यांची आणि त्यांच्या बहिणींची नावे का नाहीत. याचा राग आल्याने आरोपींनी संगनमत करून गैरकायद्याची गर्दी जमवली.
आरोपी क्रमांक १ आणि २ यांनी फिर्यादी यांना त्यांच्या हातातील काठीने डोक्यावर आणि हातावर मारहाण केली. तसेच, जमिनीवर पाडून सर्व आरोपींनी फिर्यादी आणि साक्षीदार यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी, कानावर आणि हातावर मारहाण केली. आरोपी क्रमांक २ याने फिर्यादी आणि साक्षीदार यांना ‘दिसाल त्या ठिकाणी खल्लास करून टाकू’ अशी धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
संगमेश्वर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम १८९ (२), १९१ (२), १९०, ११८ (१), ११५ (२) आणि ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.