Monday, July 6, 2026
spot_img
Home खेड जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली

जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

खेड:- रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठ फटका आता खेड तालुक्याला बसू लागला आहे. सततच्या पावसामुळे खेडमधील जगबुडी नदीने धोकापातळी ओलांडली असून तालुक्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जारी केला असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

रविवारी सकाळी ११ वाजता भरणे नाका पुलाजवळ जगबुडी नदीची पाणीपातळी ७.३० मीटर इतकी नोंदविण्यात आली. या नदीची इशारा पातळी ५.०० मीटर, तर धोकापातळी ७.०० मीटर आहे. त्यामुळे नदी सध्या धोकापातळीच्या वरून वाहत असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, खेड तालुक्यातील नारंगी नदीलाही पूर आला असून नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे. पुराच्या पाण्यामुळे नदीकाठावरील शेकडो एकर भातशेती जलमय झाली असून अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नुकतीच लागवड केलेली भातपिके अनेक ठिकाणी पाण्याखाली गेली आहेत.

पुराच्या पाण्याचा परिणाम वाहतुकीवरही झाला आहे. खेड-खाडीपट्टा मार्गावरील काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच नदीकाठावरील स्मशानभूमी आणि काही वीटभट्ट्याही पुराच्या पाण्याखाली गेल्याची माहिती समोर आली आहे.

हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढील ४८ तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदीपात्राजवळ जाणे टाळावे, अनावश्यक प्रवास करू नये तसेच परिस्थिती गंभीर झाल्यास प्रशासनाच्या सूचनांनुसार सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या महसूल, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस आणि स्थानिक प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, पाणीपातळीत होणाऱ्या प्रत्येक बदलावर नजर ठेवली जात आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास खेड तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.