चिपळूण:- चिपळूण आगाराच्या बस चालकाला कर्जतमध्ये बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आगाराच्या एका एसटी बस चालकाला अहिल्यांनगरमधील कर्जतजवळ काही तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही बस बीडहून चिपळूणच्या दिशेने निघाली होती. कर्जत जवळच्या एका बस थांब्यावर बस थांबली नाही, या कारणावरून संतापलेल्या काही प्रवाशांनी किंवा स्थानिक तरुणांनी एसटीचा पाठलाग केला.
केवळ बस न थांबल्याच्या रागातून या तरुणांनी एसटी समोर आपली दुचाकी आडवी लावली आणि चालकाला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. या भीषण मारहाणीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, चालक आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असतानाही त्याला बेदम मारलं जात आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते.
एसटी चालक-वाहकांवर अशा प्रकारे होणारे हल्ले आता चिंतेचा विषय ठरत आहेत. या प्रकरणाचा व्हिडीओसमोर आल्यानंतर आता पोलीस या मारहाण करणाऱ्यांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. चिपळूण आगारातूनही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.









