कळंबस्ते येथील रेल्वे ट्रॅकवर मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते ते खेर्डी दरम्यान रेल्वेच्या धडकेत एका ४५ वर्षीय व्यक्तीचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे.
संजय चंद्रकांत मोरे (वय ४५, मूळ रा. पिंपळी खुर्द खडकवणेवाडी, सध्या रा. कळंबस्ते, ता. चिपळूण) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २१ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास कळंबस्ते ते खेर्डी दरम्यान असलेल्या पोल क्रमांक १३१/२ जवळील रेल्वे ट्रॅकवर एक इसम पडलेला असल्याची माहिती चिपळूण रेल्वे स्टेशन मास्तर यांना एम.जी.जी.टी. च्या लोको पायलटने दिली होती. या माहितीच्या आधारे रेल्वे कर्मचारी दिगंबर सिंग आणि चंद्रशेखर यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता, तिथे एका पुरुषाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला.
रेल्वेच्या धडकेमुळे मृतदेहाचे धड आणि शिर वेगळे झाले होते. या घटनेची माहिती चिपळूण पोलीस ठाण्याला देण्यात आल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाची झडती घेतली असता, त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांवरून आणि मोबाईलवरून त्यांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी दिगंबर सिंग यांनी दिलेल्या माहितीवरून चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बी.एन.एस.एस.) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.









