चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील पेढे येथील वडकर कॉलनी परिसरात अज्ञात चोरट्यांनी भरवस्तीत घरफोडी करून लाखो रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. एकाच इमारतीमधील दोन फ्लॅटचे कडी-कोयंडे तोडून चोरट्यांनी चोरी केल्याने परिसरात घबराट पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २१ जानेवारीच्या रात्री ११ ते २२ जानेवारी २०२६ च्या सकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली. पेढे येथील वडकर कॉलनीमधील इमारतीच्या ‘बी-१०’ रूममध्ये राहणारे भास्कर उमाजी मंडले (वय ३६) हे भाड्याने राहतात. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचा कडी-कोयंडा कोणत्यातरी हत्याराने कापून घरात प्रवेश केला. कपाटातील २७,७५० रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ चोरट्यांनी लंपास केली.
केवळ एकाच फ्लॅटवर न थांबता, चोरट्यांनी याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणारे संजय पवार यांच्याही फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि तिथेही घरफोडी केली.
याप्रकरणी भास्कर मंडले यांनी २२ जानेवारी रोजी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५(क) आणि ३३१(४) नुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक २७/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
चिपळूण पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करून चोरट्यांचा शोध घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.









