१४ लाखांच्या मुद्देमालासह ७ म्हशी, एका गाईची सुटका
चिपळूण:- चिपळूण येथील पोफळी नाका परिसरात पोलिसांनी अवैध रित्या आणि क्रूरपणे जनावरांची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकवर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी सात म्हशी आणि एका गाईची सुटका केली असून, ट्रकसह एकूण १४ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२७ जानेवारी रोजी रात्री पोफळी नाका येथे एक टाटा कंपनीचा पांढऱ्या रंगाचा ट्रक (क्र. MH-04- AP-1658) संशयास्पद रित्या आढळला. फिर्यादी विशाल वसंत ओसवाल (वय ४०, रा. अलोरे) यांनी या संदर्भात माहिती दिली होती. पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये अत्यंत क्रूरपणे जनावरांना कोंबलेले दिसून आले.
तपासणीत असे आढळले की, आरोपींनी कोणत्याही वाहतूक परवान्याशिवाय जनावरांची ने-आण सुरू केली होती. ट्रकच्या आत जनावरांना चारा किंवा पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. त्यांना हालचालही करता येणार नाही अशा पद्धतीने दाटीवाटीने आणि आखूड दोरीने बांधून ठेवले होते. या क्रूर वागणुकीमुळे प्राण्यांना असह्य वेदना होत होत्या.
पोलिसांनी या कारवाईत ६ मुरा जातीच्या दुभत्या म्हशी, १ जाफरा जातीची गाभण म्हैस, १ जर्सी जातीची दुभती गाय या जनावरांची सुटका केली. यासोबत जनावरांची वाहतूक करणारा टाटा ७०९ इएक्स ट्रक जप्त करण्यात आला.
या प्रकरणी ट्रक चालक इसहाक अब्दल्ला महालुनकर (वय ५७, रा. खेड) आणि राजेंद्र बाबू तांबे (वय ५०, रा. खेड) यांच्यासह इतर साथीदारांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३(५) (समान हेतू), प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६०, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, आणि केंद्रीय मोटार वाहन नियमांतर्गत चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









