चिपळुणात डुकराच्या धडकेत जखमी कामगाराचा मृत्यू

चिपळूण:- डुकराच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या आनंद लक्ष्मण घाणेकर ( ४०) या कामगाराचा उपचारादरम्यान शनिवार 17 मे रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. ते चिपळूण तालुक्यातील खडपोली तळेवाडी येथील रहिवासी असून जे. के. फाईल्स कंपनीत कार्यरत होते. ही घटना 13 मे रोजी घडली होती.

आनंद घाणेकर हे १३ मे रोजी रात्रीच्या ड्युटी साठी दुचाकीवरून कंपनीकडे जात होते. त्याचवेळी अचानक धावत आलेल्या एका डुक्कराने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. सुरुवातीला त्यांना कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, परंतु अधिक उपचारांसाठी त्यांना पुणे येथील रुग्णालयात हलवण्यात आले.

पुण्यात त्यांच्यावर गेले काही दिवस उपचार सुरू होते. मात्र, दुर्दैवाने शनिवारी दुपारी त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनाची बातमी कळताच जे. के. फाईल्स कंपनीतील कामगार वर्गाने शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. आनंद घाणेकर यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.