चिपळुणातील महिलेची १६ लाखांची फसवणूक, दोघांवर गुन्हा

चिपळूण:- शेअर बाजारात गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून चिपळूण येथील एका गृहिणीची तब्बल १५ लाख ९२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमेधा संदीप बाष्टे (वय ३६, रा. १०५/बी, द्वारका रेसिडेन्सी, यशोधन नगर, कापसाळ, ता. चिपळूण) या गृहिणीची व्ही ट्रेड (V-Trade) नावाच्या एका ऑनलाइन ॲपद्वारे फसवणूक झाली. आरोपी अनहिता मेहता आणि भरत गाला यांनी सुमेधा बाष्टे यांना शेअर आणि आयपीओमध्ये (IPO) गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले.

या आमिषाला बळी पडून सुमेधा बाष्टे यांनी १४ एप्रिल ते २२ मे या कालावधीत वेगवेगळ्या टप्प्यांत एकूण १६ लाख ३९ हजार ४८८ रुपये ऑनलाइन पद्धतीने आरोपींच्या खात्यात जमा केले. काही दिवसांनी, आरोपींनी सुमेधा बाष्टे यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात ४६,५६५ रुपये परत केले. मात्र, उर्वरित १५ लाख ९२ हजार ९२३ रुपये परत न करता, त्यांची फसवणूक केली.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर सुमेधा चाष्टे यांनी २१ ऑगस्ट २०२५ रोजी चिपळूण पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी अनहिता मेहता आणि भरत गाला या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.