रत्नागिरी:-कोरोनाने वाडी-वस्तीवर हातापाय पसरले असून रत्नागिरी तालुक्यातील परिस्थिती गंभीर बनत आहे. आरोग्य विभागाने सरसकट चाचणीसाठी मोबाईल पथकांचा प्रयोग सुरु केला आहे. स्वतःहून ग्रामस्थ चाचणीसाठी पुढे येत नसल्याने आरोग्य विभाग हतबल झाला आहे. चारपेक्षा अधिक रुग्ण सापडणार्या वाडीतील सरसकट चाचण्यांसाठी ग्रामकृतीदलाचे सहकार्य घेण्यास आरंभ केला आहे.
जिल्ह्यात बाधितांचा आकडा ४० हजारावर गेला आहे. त्यातील ११ हजार ५२९ बाधित हे एकट्या रत्नागिरी तालुक्यातील आहेत. सध्या १ हजार ४३३ जणं विविध केंद्रावर उपचार घेत आहेत. १ ते ६ जून या कालावधीत जिल्ह्यात साडेतीन हजार बाधित सापडेल असून त्यात रत्नागिरीतील ८३८ जणांचा समावेश आहे. एका रुग्णामागे जेमतेम ७ जणांचे ट्रेसिंग करण्यात आरोग्य विभागाला यश येत आहे. चाचण्यांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये व्यवस्था केली आहे. तरीही सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असलेले ग्रामस्थ चाचणी करून घेण्यासाठी येत नाहीत. खासगी वैद्यकीय अधिकार्यांकडे तात्पुरती औषधे घेऊन वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. रत्नागिरीत दररोज चारशे चाचण्या होत असून त्यात बाधित येणारे रुग्ण अधिक आहेत. ग्रामस्थांना चाचणीसाठी धरून आणावे लागत आहे. रत्नागिरी कोरोनाचा हॉटस्पॉट कायम राहिला आहे.
सध्या मोबाईल पथकांमार्फत वाडी-वस्तीवर जाऊन चाचण्या केल्या जाणार आहेत. त्यासाठी ग्रामकृतीदलाची मदत घेण्यात येत आहे. गावखडी, फणसवळे, मालगुंड येथे या पद्धतीने चाचण्या केल्या गेल्या आहेत. मिरजोळे येथे लवकरच अशी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. दरम्यान, बाधितांबरोबरच मृत्यूच्या संख्येतही रत्नागिरी तालुका अग्रेसर आहे. जिल्ह्यात बाराशेहून अधिक रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. त्यातील ३८८ जणं रत्नागिरीतील आहेत. उपचारासाठी बाधित उशिरा आल्यामुळे त्यांचे मृत्यू होत असल्याचे आरोग्य यंत्रणा सांगत आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत रत्नागिरीतील ही आकडेवारी चिंताजनक ठरत आहे.
आरोग्य विभागाकडून गावोगावच्या लोकांना समजूत घालून चाचणीसाठी आणत आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलिसी बळाचा वापर करण्याची वेळ रत्नागिरीत आली नसल्याचे प्रशासन सांगत आहे; मात्र रुग्णांचा वाढता टक्का पाहता आरोग्य विभागाला हा पर्याय अवलंबावा लागणार आहे.









