Tuesday, October 27, 2026
spot_img
Home गुन्हेगारी घाटीवळे, करंजारीत एकाच रात्री पाच घरे फोडली

घाटीवळे, करंजारीत एकाच रात्री पाच घरे फोडली

चोरट्यांच्या सुळसुळाटामुळे परिसरात तीव्र घबराट

साखरपा:- संगमेश्वर तालुक्यातील देवरुख पोलीस ठाण्याच्या अखत्यारीतील घाटीवळे आणि करंजारी परिसरात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री धुमाकूळ घालत तब्बल पाच घरे फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांच्या या वाढत्या सुळसुळाटामुळे दोन्ही गावांत सध्या भीतीचे सावट पसरले आहे. घाटीवळे गावातील मुसलमान वाडी येथील अब्दुल रहमान फोडकर, इकबाल उमर फोडकर आणि अब्दुल मज्जिद शिरगावकर या तिघांच्या बंद घरांना लक्ष्य करून चोरट्यांनी कुलपे तोडत आतील ऐवज लंपास केला.

घाटीवळे येथे हातसफाई केल्यानंतर चोरट्यांनी तेथून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गालगत वसलेल्या करंजारी गावावर मोर्चा वळवला. महामार्गाला लागूनच असलेल्या चंद्रकांत शिवराम भुर्के यांच्या बंद घरावर तसेच बाबा वळंजु यांच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारला. बाबा वळंजु हे काही कामानिमित्त बाहेर गेले असताना ही संधी साधून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. या दोन्ही ठिकाणांहून सुमारे बावन्न हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.

विशेष म्हणजे बाबा वळंजु यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी केल्यानंतर, चोरट्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या आणि कोणाला संशय येऊ नये या हेतूने त्याच कडी-कोंड्याला स्वतःचे दुसरे कुलूप ठोकून तेथून पोबारा केला. महामार्गालगतच्या घरांवरही अशा प्रकारे धाडसी चोऱ्या झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. या संपूर्ण घटनेची रीतसर माहिती साखरपा पोलिसांना देण्यात आली असून, या प्रकारामुळे घाटीवळे आणि करंजारी परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे. पोलिसांनी या भागात तातडीने गस्त वाढवून संशयित चोरट्यांचा छडा लावावा, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.