Saturday, October 3, 2026
spot_img
Home गुन्हेगारी घरफोडीचे तीन वेगवेगळे गुन्हे उघडकीस; आरोपी गजाआड,

घरफोडीचे तीन वेगवेगळे गुन्हे उघडकीस; आरोपी गजाआड,

चोरीचा मुद्देमाल हस्तगत

राजापूर:- तालुक्यातील नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंद घरे फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्यात नाटे पोलिसांना यश आले. पोलिसांनी स्वतंत्र तपासाच्या माध्यमातून घरफोडीचे तीन वेगवेगळे गुन्हे उघडकीस आणत संबंधित आरोपींना गजाआड केले असून, त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांत घरफोडीच्या तीन घटना घडल्या होत्या. भालावली-वरचा भंडारवाडा येथील शेतकरी विश्वास महादेव भोसले यांच्या बंद घराची कडी काढून चोरट्यांनी कपाटातील सुमारे १ लाख ७० हजार रुपये किमतीची सोन्याची चपटी चेन चोरून नेली होती.

तसेच नाटे येथील ‘यश होम स्टे’च्या पाठीमागे राहणारे सुपरवायझर रोशन मोठाभाऊ बच्छाव हे कामावर गेले असताना त्यांच्या भाड्याच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याची गोफ चेन, अंगठी, चांदीचे दागिने तसेच १ लाख रुपये रोख असा सुमारे २ लाख १९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता.
नाणार-भटवाडी येथील सेवानिवृत्त सिस्टर लता वासुदेव साईम या कामानिमित्त घराबाहेर गेल्या असताना चोरट्यांनी त्यांच्या घराचे मुख्य कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातील चांदीची पूजेची भांडी व साहित्य चोरून नेले होते.

या सलग घरफोड्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन नाटे पोलिसांनी गुप्त बातमीदार, तांत्रिक विश्लेषण आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला. अथक प्रयत्नांनंतर पोलिसांनी तिन्ही वेगवेगळ्या गुन्ह्यांतील आरोपींचा माग काढत त्यांना अटक केली.
नाणार येथील घरफोडीप्रकरणी बीड जिल्ह्यातील कासारी, ता. आष्टी येथील संजय उर्फ मोहन निकाजा भोसले आणि नितेश उर्फ संतोष मरदान भोसले यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल निखिल माने करीत आहेत.

दरम्यान, उर्वरित दोन घरफोडीच्या गुन्ह्यांतील आरोपींनाही पोलिसांनी जेरबंद केले असून, तिन्ही गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि लांजा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नाटे सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपासासाठी विशेष मेहनत घेतली.