Thursday, June 18, 2026
spot_img
Home खेड घरडा केमिकल कंपनीत वायू गळती; कामगाराचा मृत्यू

घरडा केमिकल कंपनीत वायू गळती; कामगाराचा मृत्यू

खेड:- लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील घरडा केमिकल कंपनीत वायू गळतीचा त्रास होऊन आवाशी (ता. खेड) गावातील एका स्थानिक कामगाराचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आवाशी ताम्हणवाडी येथील मूळ रहिवासी सुधीर बाळकृष्ण आंब्रे (५७, सध्या रा. आवाशी गणेशनगर) हे रविवारी १४ जून रोजी दुपारच्या पाळीत येथील घरडा केमिकल कंपनीत कामावर होते. रात्री साडेआठ नऊच्या दरम्यान ते ज्या प्लांटमध्ये काम करत होते तेथे त्यांना वायुगळतीची बाधा झाली. लागलीच त्यांना कंपनीतील प्राथमिक उपचार केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर ते रात्री अकरानंतर घरी आले. मात्र त्यांना रात्रभर खोकल्याचा त्रास होत होता.

सोमवारी १५ रोजी सकाळी ते पहिल्या पाळीत कामावर गेले. मात्र, पुन्हा त्यांना त्रास जाणवू लागल्याने पुन्हा कंपनीच्या वैद्यकीय कार्यालयात त्यांनी उपचार घेतले. मात्र त्यांचा त्रास कमी होत नसल्याचे तेथील डॉक्टरांच्या लक्षात आल्याने त्यांनी कंपनीच्या घरडा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी वेळेत हजर नसल्याने त्यांना पुढील उपचार देण्यास विलंब झाला. यात त्यांचा मृत्यू ओढवला. ही घटना सोमवार १५ रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. सुधीर आंब्रे हे धर्माधिकारी संप्रदायाचे निरुपणकार होते. घरडा कंपनीत त्यांनी जवळपास ३५ वर्ष सेवा केली आहे. कंपनीत ते युनियनचे पदाधिकारी म्हणून कार्य करीत होते. आठ महिन्यानंतर ते सेवानिवृत्त होणार होते. अतिशय खेळकर आणि मनमिळाऊ स्वभावामुळे ते पंचक्रोशीत परिचित होते. आवाशी गाव व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा व मुलगी, नातू, सून तीन भाऊ, बहिणी, आई असा मोठा परिवार आहे.