बापाला वाचवायला गेलेल्या मुलालाही मारहाण
रत्नागिरी:- शहरातील राजिवडा पुलाखाली मंगळवारी दि. २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास मासेमारी करणाऱ्या एका व्यक्तीला आणि त्याच्या मुलाला रमजान नवाज मिरकर आणि नवाज अलीसाहब मिरकर या दोघांनी किरकोळ वादातून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. यात बाप-लेक दोघेही जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नजीर हसनमियाँ होडेकर (वय ५२, रा. राजिवडा पुलाखाली, रत्नागिरी) हे मासेमारी करून घरी आले असता, आरोपी रमजान नवाज मिरकर (वय २६) हा नजीर यांचा मुलगा अरमान याला मारहाण करत होता. हे पाहून भांडण सोडवण्यासाठी नजीर होडेकर मध्ये पडले. त्यावेळी आरोपी रमजान मिरकर याने नजीर होडेकर यांना “तू इथे थांबू नकोस, तुमच्या पत्नीने माझी आणि तुमच्या सुनेशी असलेल्या प्रेमाच्या संबंधांबद्दल बदनामी केली आहे. आता तुम्हालाही मारून टाकीन,” असे धमकावले.
या धमकीनंतर आरोपी रमजान मिरकर याने त्वेषाने नजीर होडेकर यांच्या डोक्यात लादीचा (दगडाचा) तुकडा मारून त्यांना जखमी केले. त्याचवेळी आरोपी नवाज अलीसाहब मिरकर (वय ४५, दोघेही रा. राजिवडा, रत्नागिरी) याने नजीर यांना हाताने मारहाण केली. आरोपी रमजान मिरकर याने त्याच दगडी लादीने भांडण सोडवणाऱ्या नजीर यांचा मुलगा अरमान होडेकर याच्याही डोक्यात मारून त्याला गंभीर दुखापत केली. इतकेच नव्हे, तर दोन्ही आरोपींनी बाप-लेकांना शिवीगाळ केली, अशी फिर्याद नजीर होडेकर यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
या घटनेनंतर फिर्यादी नजीर हसनमियाँ होडेकर (वय ५२) आणि त्यांचा मुलगा अरमान होडेकर (वय निश्चित नाही) या दोघांनाही दुखापत झाली आहे. नजीर होडेकर यांच्या फिर्यादीनुसार, दि. २१/१०/२०२५ रोजी रात्री ११.३४ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आरोपी रमजान नवाज मिरकर आणि नवाज अलीसाहब मिरकर यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कायदा २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) नुसार गु.र.क्र. ४०८/२०२५ दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.