गोडबोले स्टॉप येथे दोन तरुणांमध्ये हाणामारी

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या मारुती मंदिर, गोडबोले स्टॉप परिसरात भर सकाळी दोन तरुणांमध्ये जोरदार ‘राडा’ झाल्याची घटना घडली आहे. सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना थापटांनी मारहाण करणे, शिवीगाळ करणे आणि इतकेच नव्हे तर पोलिसांसमक्षच एकमेकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी, कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानेच फिर्याद दिली असून, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दोन्ही तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी, दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ०९.१५ वाजण्याच्या सुमारास मारुती मंदिर, गोडबोले स्टॉप येथील सार्वजनिक ठिकाणी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी: १) ऋतिक बेरप्पा खेत्री (वय २० वर्ष, रा. कुवारबाव, रविंद्रनगर) २) आकाश चंद्रकांत खेत्री (वय २३ वर्ष, रा. क्रांतीनगर झोपडपट्टी)

हे दोघेही भररस्त्यात एकमेकांशी वाद घालत होते. हा वाद इतका विकोपाला गेला की त्यांनी एकमेकांना हाताच्या थापटांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.ज्यावेळी हा प्रकार सुरू होता, त्यावेळी पोलीस कर्मचारी तेथे हजर होते. मात्र, कायद्याचा कोणताही धाक न बाळगता या दोघांनी पोलिसांसमक्षच एकमेकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आणि “तुला मारून टाकीन” अशा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यास सुरुवात केली. त्यांच्या या कृत्यामुळे परिसरातील सार्वजनिक शांततेचा भंग झाला.

सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणे, मारहाण करणे आणि धमकी देणे या गंभीर प्रकाराची दखल घेत, पोलीस मुख्यालय रत्नागिरी येथे नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल भूषण शांताराम पाताडे (वय ३४) यांनी स्वतः सरकारतर्फे फिर्याद दिली.