गुहागर येथील घटना
गुहागर:- गुहागर तालुक्यात गॅस सिलेंडर चोरीच्या घटना वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील विविध भागांतील वेगवेगळ्या घरांतून तब्बल सात गॅस सिलेंडर चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरफोडी, दागिने, रोकड चोरी, ऑनलाइन फसवणूक यानंतर आता थेट घरातील जीवनावश्यक वस्तूंवरच चोरट्यांनी डल्ला मारण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, गॅस सिलेंडरचा वाढता तुटवडा, पुरवठ्यातील अडचणी आणि बाजारातील अस्थिर परिस्थिती यामुळे सिलेंडरला काळ्या बाजारात मागणी वाढली असून, त्याचाच फायदा घेत चोरट्यांनी नव्या पद्धतीने गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुहागरमधील काही वस्त्या, गल्लीबोळ आणि निवासी भागांमध्ये रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराबाहेर, पडवीत किंवा स्वयंपाकघराच्या मागील बाजूस ठेवलेले गॅस सिलेंडर हेरून ते पळवले.
या घटनांमध्ये एक-दोन नव्हे तर सात सिलेंडर वेगवेगळ्या घरांतून चोरीला गेल्याने ही साधी चोरी नसून पूर्वनियोजित टोळी सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक कुटुंबांनी सकाळी उठल्यानंतर सिलेंडर जागेवर नसल्याचे पाहून धक्का व्यक्त केला. काही घरांमध्ये तर रिकामा आणि भरलेला सिलेंडर यातील फरक न करता चोरट्यांनी हाताशी लागेल तो सिलेंडर उचलल्याचेही सांगितले.
गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, पूर्वी घरफोडी करून दागिने, रोकड, मौल्यवान वस्तू चोरल्या जात होत्या. त्यानंतर काळ बदलला आणि नेट बँकिंग, ऑनलाइन व्यवहार, यूपीआय, बँकिंग अॅप्स यांचा वापर वाढल्यानंतर ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्हे, आर्थिक घोटाळे मोठ्या प्रमाणात वाढले.
परंतु आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, घर चालवण्यासाठी आवश्यक असलेली स्वयंपाकाची मूलभूत साधनेही सुरक्षित राहिलेली नाहीत. गॅस सिलेंडर चोरीच्या प्रकारामुळे गुन्हेगारीचे स्वरूप अधिकच चिंताजनक होत असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी व्यक्त केले आहे.









