Saturday, October 24, 2026
spot_img
Home गुन्हेगारी गॅस सिलेंडरच्या वादातून प्रौढाला मारहाण

गॅस सिलेंडरच्या वादातून प्रौढाला मारहाण

चिपळूणमध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

चिपळूण:- गॅस सिलेंडर देण्यावरून झालेल्या वादातून भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या पश्चिम बंगालमधील एका ४२ वर्षीय व्यक्तीला शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील बळवंत पाटील विकासवाडी परिसरात घडली. या मारहाणीत सहीदुल अमीरुद्दीनमिया हक हे जखमी झाले असून, या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. फिर्यादी सहीदुल अमीरुद्दीनमिया हक (वय ४२, मूळ रा. उनिसबिशा, ता. घोकशादंगा, जि. कुचबिहार, पश्चिम बंगाल) हे सध्या खेर्डी येथील बळवंत पाटील विकासवाडी परिसरात भाड्याच्या खोलीत राहतात. घटनेच्या वेळी ते जेवण करून आपल्या खोलीत आराम करत होते. त्याचवेळी अब्बास मिया (वय ४७), मनिजा बीबी (वय ४५) आणि राजीव मिया (वय २१, सर्व रा. खेर्डी, ता. चिपळूण) हे त्यांच्या खोलीत आले. त्यांनी फिर्यादींकडे वापरात असलेला गॅस सिलेंडर तातडीने देण्याची मागणी केली.

फिर्यादी यांनी एक दिवसाची मुदत देण्याची विनंती करत दुसऱ्या दिवशी सिलेंडर देतो, असे सांगितले. मात्र, यावरून आरोपींनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि तात्काळ सिलेंडर देण्याचा आग्रह धरला. यावेळी आरोपी अब्बास मिया याने स्वयंपाकघरातील मसाला कुटण्याचा लोखंडी रॉड घेऊन फिर्यादींच्या डोक्यात मारल्याचा आरोप आहे. त्यानंतर राजीव मिया याने अब्बासच्या हातातील रॉड घेऊन फिर्यादींच्या डाव्या खांद्यावर वार केला. दरम्यान, अब्बास मिया याच्या पत्नीने घरातील झाडूने मारहाण करण्याचा प्रयत्न करत शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी २२ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे १ वाजून ५५ मिनिटांनी चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.