गुहागर:- वर्षअखेरच्या सुट्ट्यांचा उत्साह आणि समुद्रातील मौज मजा लुटताना गुहागर समुद्रकिनारी आज एक हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबईहून गुहागरात पर्यटनासाठी आलेल्या तरुणांपैकी एकजण बुडून मृत्यू झाला. तर दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे. अमोल मुथिया (वय ४२, रा. मुंबई) असे मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे.
मुंबईहून आलेले पर्यटक गुहागर किनाऱ्यावर समुद्रात उतरले होते. सुरुवातीला सगळे काही सुरळीत सुरू होते, मात्र क्षणातच समुद्राचा रौद्र अवतार दिसू लागला. जोरदार प्रवाहामुळे तिघे पर्यटक बुडू लागले. आरडाओरड होताच आजूबाजूला असलेल्या स्थानिकांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखले आणि कोणतीही सुरक्षा साधने नसताना थेट समुद्रात उड्या मारत बचावकार्य सुरू केले. जीव धोक्यात घालून त्यांनी तिघांना बाहेर काढले.
या घटनेत अमोल मुथिया (वय ४२, रा. मुंबई) यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. त्यांना तातडीने गुहागर शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेमुळे किनाऱ्यावर शोककळा पसरली.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वारंवार सूचना, फलक आणि इशारे देऊनही पर्यटक समुद्रातील धोक्यांकडे दुर्लक्ष करतात, यामुळेच अशा दुर्घटना घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.









