Saturday, May 2, 2026
spot_img
Home गुन्हेगारी गुहागर येथे घरफोडीचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला मुंबईतून बेड्या

गुहागर येथे घरफोडीचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला मुंबईतून बेड्या

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई

रत्नागिरी:- गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेतील ‘ओंकार ज्वेलर्स’ या दुकानावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छडा लावला आहे. या प्रकरणी घाटकोपर आणि कुर्ला (मुंबई) येथून ४ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार आणि साहित्यासह एकूण ११ लाख ९५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

१८ फेब्रुवारी रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास शृंगारतळी येथील ओंकार ज्वेलर्सचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला होता. चोरट्यांनी आतील शटरही तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (६), ३३१ (४), ६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांनी दिलेल्या सूचनांनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला होता. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने मुंबईत सापळा रचला आणि आरोपी
निशांत सुधीर आंबोकर (पंतनगर, घाटकोपर), मोईन शकील शेख (घाटकोपर), सुमित कुलदीप चुनियाना (कोहिनूर सिटी, कुर्ला) आणि आयुष जितेंद्र घागडा (लक्ष्मण नगर, घाटकोपर) यांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली एक चारचाकी गाडी आणि इतर घरफोडीचे साहित्य जप्त केले आहे. या सर्व मालाची किंमत ११.९५ लाख रुपये इतकी आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप ओगले, पोलीस हवालदार विजय आंबेकर, गणेश सावंत, दीपराज पाटील, योगेश नार्वेकर आणि चालक अतुल कांबळे यांनी केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास गुहागर पोलीस करत आहेत.