Sunday, May 3, 2026
spot_img
Home गुन्हेगारी गुहागरातील घरफोडीत ७ लाखांची रोकड लंपास

गुहागरातील घरफोडीत ७ लाखांची रोकड लंपास

चार लाखांचे दागिनेही लांबवले; चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद

गुहागर:- शहरातील खालचापाट ब्राह्मणवाडी येथे दोन चोरट्यांनी घरफोडी करून सात लाख रुपयांच्या रोकडीसह तीन ते चार लाखांचे दागिने चोरून नेल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली आहे. गुहागर पोलीस ठाण्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर झालेल्या या चोरीमुळे पोलिसांसमोर एकप्रकारे आव्हान उभे ठाकले आहे. घरमालक रवींद्र शिरद शिंदे हे कामानिमित्त मुंबई येथे गेले असताना बुधवारी रात्री २ वाजून ४९ मिनिटांनी हा प्रकार घडला. घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आहे.

शहरातील खालचापाट येथे रस्त्यालगत रवींद्र शिंदे यांचे दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज आहे. आपल्या घरासमोरील अंगणामध्ये ते दुचाकी दुरुस्तीचे काम करतात. २४ एप्रिल रोजी रवींद्र शिंदे हे कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. घरी कोणी नसल्याचा फायदा घेत बुधवारी रात्री २ वाजून ४९ मिनिटांनी दुचाकीने दोनवेळा गॅरेज बाहेर फेऱ्या मारून पाहणी केल्यानंतर दोन चोरटे तोंड झाकून हातामध्ये ग्लोव्हज घालून शिंदे यांच्या घरी आल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसून आले आहे.

शिंदे यांच्या सामायिक घरात त्यांचे भाऊ व कुटुंबिय वेगवेगळे राहतात. रात्री २ वा. ३० वाजेपर्यंत कामानिमित्त जागे होते. त्यानंतर २० मिनिटांनी चोरट्यांनी संधी साधली. यातून चोरटे सराईत असावेत अशी चर्चा शहरात सुरू आहे. चोरट्यांनी घराच्या प्रमुख दाराची कडी उचकटून काढत घरात प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाटामधील सर्व कपडे बाहेर काढून कपाटामध्ये ठेवलेली रोख रक्कम रुपये ७ लाख, सुमारे तीन ते चार लाखाचे सोन्याचे दागिने, ज्यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र, चार चैन, अंगठी असे चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती रवींद्र शिंदे यांनी गुहागर पोलीस ठाण्यात दूरध्वनीवरून दिली आहे.

घरमालक रवींद्र शिंदे मुंबईमध्ये होते. यामुळे सदर घटनेची खबर त्यांचे भाऊ नितीन शिंदे यांनी गुहागर पोलिसांना दिली. सदर चोरीची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सचिन सावंत, पोलीस हवालदार किशोर साळवी, रहाटे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.