पर्यटकांसह स्थानिकांची पाहण्यासाठी गर्दी
गुहागर:- यंदाच्या पावसाळी वातावरणात गुहागरच्या किनारपट्टीवर एका अनोख्या आणि दुर्मिळ पाहुण्याचे आगमन झाले आहे. सातासमुद्रापार प्रवास करून आलेला ‘ब्राऊन बुबी’ हा सागरी पक्षी गुहागरच्या समुद्रकिनारी दिसून आला असून, या दुर्मिळ पक्ष्याला पाहण्यासाठी स्थानिकांनी आणि पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे.
ब्राऊन बुबी हा प्रामुख्याने उष्णकटिबंधीय महासागरांमध्ये आढळणारा सागरी पक्षी आहे. आपल्या नैसर्गिक अधिवासापासून भरकटल्यामुळे हा पक्षी गुहागरच्या किनाऱ्यावर पोहोचला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. किनारी भागात एकाच जागी स्थिर असलेला हा पक्षी सध्या सर्वांचेच आकर्षण ठरत आहे.
हा पक्षी दिसायला अतिशय आकर्षक असून त्याच्या शरीराचा रंग तपकिरी आणि पांढऱ्या रंगाच्या छटांचा आहे. त्याचे डोळे चमकदार असून चोच लांब आहे. ब्राऊन बुबी हा पक्षी हवेत कसरती करण्यात आणि मासे पकडण्यासाठी समुद्रात कुशलतेने डुबकी मारण्यात पटाईत मानला जातो.
सध्या हा पक्षी समुद्रकिनारी थकलेल्या अवस्थेत स्थिर दिसत असल्याने स्थानिक नागरिक आणि निसर्गप्रेमींकडून त्याच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जात आहे. अनेक वर्षांनंतर गुहागरच्या किनारपट्टीवर अशा प्रकारचा दुर्मिळ पाहुणा आल्याने निसर्गप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.









