७ लाखांच्या ऐवजासह ट्रक दुचाकी जप्त, दोघे अटकेत
खेड:- गुजरात येथून चिपळूणच्या दिशेने खैर लाकडांची वाहतूक करणारा ट्रक महाड वनविभागाच्या पथकाने मुंबई – गोवा महामार्गावरील पोलादपूरनजीक जप्त केला. ७ लाख रुपये किमतीच्या खैराचा साठा हस्तगत करत दुचाकीही जप्त केली.
याप्रकरणी मोहम्मद अरसद (वलसाड, गुजरात), मोहम्मद उस्मान नुद्दिन खान (मुलुंड, मुंबई) या दोघांना अटक केली. दोघांना महाड न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. खैर वाहतुकीचे चिपळूण कनेक्शन पुन्हा उघड झाले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक (एमएच ०१२ इक्यु ९८६६) संशयास्पदरित्या फिरत असल्याची बाब महाड वनविभागाच्या निदर्शनास आली. खैर लाकूड वाहतूक लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रकला रस्ता दाखवण्यासाठी दुचाकीवरील (एमएच ०३ डीक्यु ६१०९) एकजण पुढे असल्याची बाब पथकाच्या निदर्शनास आली. त्यानुसार महाड वनविभागाच्या पथकाने सापळा रचून ट्रक दुचाकीसह दोघांनाही ताब्यात घेतले.
ट्रकमध्ये खैर लाकडाचे २०१ तुकडे आढळून आले. पथकाने मोजमाप केले असता ४५७३ घनमीटर साठा असल्याचे निदर्शनास आले. या खैर लाकडांची बाजारभावाप्रमाणे ७ लाख १ हजार ८६६ रुपये इतकी रक्कम असल्याचे तपासात निष्पन्न झाले. हा ट्रक गुजरात येथून येत असताना मूळ चालकाला चिपळूणचा रस्ता माहीत नसल्याने त्याला पनवेल येथे उतरवण्यात आले. तिथून पुढे दुसरा चालक वाहनावर बसवण्यात आला.
अवैधरित्या वाहतुकीतील खैराचा साठा
चिपळूणमध्ये नेमका कोणाला दिला जाणार होता, तो कुठे खाली होणार होता, याबाबतचा तपास वनविभागाच्या पथकाकडून सुरू आहे. रोहा उपवनसंरक्षक व सहाय्यक संरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल आशिष पाटील, पोलादपूरचे वनपाल व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.









