सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून व्हॉट्सॲप कॉलद्वारे फसवणूक
रत्नागिरी:- सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून गुंतवणुकीच्या आमिषाने गुहागर तालुक्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची १५ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. शनिवारी (ता. ७) नोव्हेबरला गुहागर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप दिवाण असे संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय सहदेव गडदे (वय ६८, व्यवसाय निवृत्त, सध्या रा. मुलुंड पूर्व, मुंबई ; मूळ रा. कीर्तनवाडी, गुहागर, जि. रत्नागिरी) हे गणपती उत्सवानिमित्त गुहागर येथे आले होते. २७ सप्टेंबर ला सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास संशयिताने त्यांच्या मोबाइल क्रमांकावर व्हॉट्सॲप कॉल केला. आपण बंगळूर येथील सीबीआय कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले. संशयिताने तक्रारदारांच्या नावाने कॅनरा बँकेच्या मुलुंड येथील शाखेत खाते उघडण्यात आल्याची बतावणी केली. या खात्यातून तीन कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे सांगत, त्यापैकी दहा टक्के म्हणजेच ३० लाख रुपये सदाकत खान याना दिल्याचेही सांगितले. तक्रारदारांच्या खात्यात केवळ २० हजार रुपये असल्याचे सांगितल्यानंतर संशयिताने कॉल कट केला. त्यानंतर संशयिताने तक्रारदारांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल असल्याची प्रत पाठवली. मात्र, ही प्रत मिळणार नाही, असे सांगून संशयिताने स्वतःच तो संदेश डिलीट केला. तसेच तपासासाठी ठरावीक रक्कम खात्यावर जमा करावी लागेल, अन्यथा अटक केली जाईल, अशी धमकी दिली. १ ऑक्टोबरला संशयिताने व्हॉट्सॲप कॉल करून तपासासाठी २५ लाख रुपये जमा करण्याची मागणी केली. त्यानंतर १४ ऑक्टोबर ला दुपारी साडेबार वाजण्याच्या सुमारास संशयित संदीप दिवाण तक्रारदारांकडून बँक खात्याचा क्रमांक घेतला. त्यांच्या एसबीआय बँकेच्या चेकबुकवर १५ लाख रुपयांचा धनादेश भरून तो मुलुंड पूर्व येथील एसबीआय शाखेत जमा करण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदारांनी धनादेश जमा केला. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी विजय गडदे यांनी गुहागर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्द गुन्हा दाखल केला आहे. संशयितास अद्याप अटकेत नसून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.









