चिपळूण:- गुहागर तालुक्यातील गिमवी येथे रानडुकराची शिकार करणाऱ्या तिघा संशयितांना वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक बंदूक, रानडुक्कर आणि चारचाकी वाहनही जप्त करण्यात आले आहे.
विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई -पाटील, सहाय्यक संरक्षक प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूणचे परिक्षेत्र वनाधिकारी सरवर खान, गुहागरचे वनपाल अमित निमकर, चिपळूणचे वनपाल सावंत, वनपाल चिपळूण सिद्धेश्वर गायकवाड, अरविंद मांडवकर, कुमार पवार, वनरक्षक राहुल गुंठे, कृष्णा इरमले यांनीही कारवाई केली. वनविभागाचे पथक सोमवारी (ता. २३) गिमवी येथे रात्री साडेदहा वाजता गस्त घालत असताना त्यांना विना नंबरप्लेटची चारचाकी गाडी संशयितरीत्या आढळली. वनविभागाच्या पथकाने या चारचाकीची चौकशी केल्यानंतर साध्या वाहनाच्या हौद्यामध्ये एक मोठे रानडुक्कर शिकार करून ठार मारून ठेवलेले, तसेच त्या वाहनामध्ये एक डबलबार १२ बोअर बंदूक आढळून आली. ही शिकार प्रसाद सुभाष सोम, रोशन रमेश मोरे, संदीप वसंत गावडे (सर्वजण रा. गिमवी) यांनी केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. या तिघांना वनविभागाने ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.









