Monday, June 15, 2026
spot_img
Home रत्नागिरी गयाळवाडी फाटा येथे भरधाव बोलेरोची पोलीसांच्या वाहनाला जोरदार धडक

गयाळवाडी फाटा येथे भरधाव बोलेरोची पोलीसांच्या वाहनाला जोरदार धडक

रत्नागिरी:- रत्नागिरी-हातखंबा महामार्गावर गयाळवाडी फाटा येथे भरधाव बोलेरो पिकअप गाडीने रॉग साईडने येऊन सरकारी वाहनाला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातानंतर बोलेरो चालक गाडीसह घटनास्थळावरून पसार झाला असून, याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी १२:३० च्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी नवनाथ विक्रम शेंडे (वय ३४, चालक, पोलीस मुख्यालय, रत्नागिरी) हे सरकारी वाहन (क्र. MH-08/AX-0501) घेऊन जात होते. यावेळी गयाळवाडी फाटा येथील ‘रिलॅक्स बिअर शॉपी’ समोरून जात असताना, विरुद्ध दिशेने आलेल्या एका सफेद रंगाच्या बोलेरो पिकअपच्या चालकाने वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून आणि निष्काळजीपणे गाडी चालवत सरकारी वाहनाला उजव्या बाजूने जोरात धडक दिली.

​अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, धडक दिल्यानंतर चालक न थांबता गाडीसह वेगाने पळून गेला. या अपघातात सरकारी वाहनाचे नुकसान झाले आहे.

​फिर्यादी नवनाथ शेंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून, रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम २८१ आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांन्वये (१८४, १३४(ब)/१७७) गुन्हा दाखल केला आहे. पसार झालेल्या बोलेरो चालकाचा पोलीस शोध घेत असून, पुढील तपास सुरू आहे.