१ ऑगस्टपासून आरक्षणाला सुरुवात
रत्नागिरी:- रेल्वेने चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. मध्य रेल्वेने गणेशोत्सवाच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी २४६ गणपती विशेष ट्रेन चालविण्याची घोषणा केली आहे. या ट्रेनमध्ये एसी, स्लीपर आणि अनारक्षित अशा १८४ मिश्र स्पेशल ट्रेन असणार आहे.
तर ६२ अनारक्षित विशेष ट्रेन असणार आहेत. कोकणात गणेशोत्सवासाठी चाकरमानी दरवर्षी कोकणात दोन ते चार दिवस जाऊन गणपती सण साजरा करत असतात. मध्य रेल्वेच्या नियमित ट्रेनचे आरक्षण नुकतेच सुरु होऊन फुल्ल देखील झाले आहे. आता या स्पेशल ट्रेनचे आरक्षण १ , २ आणि ३ ऑगस्ट पासून आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरुन सुरु होत आहे.
यावेळी एकाच वेळी सर्व गाड्यांचे आरक्षण करावे लागणार नाही ही बाब त्यातल्या त्यात चांगली आहे. हे आरक्षण 1 ते 3 ऑगस्ट असे तीन दिवस विभागून दिले आहे. गाडी क्रमांक 01446 ही आढवड्यातून एकदाच आहे. आणि ती देखील 15 सप्टेंबरला आहे. आणि गणपती यंदा 14 सप्टेंबरला येत आहेत. त्यामुळे दोन दिवस आधीची ट्रेन असतील तर चाकरमान्यांना फायदा झाला असता असे प्रवासी बळीराम राणे यांनी म्हटले आहे.
अनारक्षित गाड्या सोडण्याची मागणी
गाडी क्रमांक 011003 ही गाडी दुपारी 3.30 ला सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता सावंतवाडीला पोचणार ही वेळ गैरसोयीची आहे, कारण मध्यरात्री उशिरा कोकणातील विविध स्थानकावर या ट्रेन पोहचणार आहेत ही वेळ गैरसोयीची आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण हे विशेष भाडे आकारून केले जात असते. नेहमीपेक्षा साधारण 100 ते 200 रुपये ज्यादा आकारले जातात, त्यामुळे या ट्रेनची तिकिटे तरी सर्वसामान्य प्रवाशांना मिळणार आहेत का? वास्तविक अनारक्षित गाड्या सोडण्यावर भर द्यायला हवा होता असे प्रवासी बळीराम राणे यांनी म्हटले आहे. मध्य रेल्वे द्वारे येणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी २४६ गणपती विशेष गाड्या चालवणार आहे.









