राजापूर पोलिसांची धडक कारवाई
राजापूर:- राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोंडये ब्रिजवर घडलेल्या बहुचर्चित व गंभीर गुन्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत व मुख्य फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्यात राजापूर पोलिसांना मोठे यश आले आहे. गणेश शाहीर मोरे (रा. वडवळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर) असे जेरबंद करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
राजापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर ११२/२३ (भा.दं.वि. कलम ३५३, ४६७, ४६८, १२० (ब) आणि भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५, २७) अन्वये दाखल गुन्ह्यात पुणे येथील आठ आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली असून त्यांच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणातील मूळ सूत्रधार असलेला आरोपी गणेश मोरे हा गुन्हा घडल्यापासून मागील तीन वर्षांपासून सतत पोलीस यंत्रणेला चकवा देऊन फरार होता.
रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाडे यांनी जिल्ह्यातील फरारी व पाहिजे असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्याचे कडक निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी एका विशेष तपास पथकाची नियुक्ती केली होती.
या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे, पोलीस अंमलदार दीपक काळे आणि सागर कातकर यांनी गोपनीय माहिती आणि अत्याधुनिक तांत्रिक विश्लेषणाची मदत घेत आरोपीच्या हालचालींचा बारकाईने माग काढला. यानंतर सोलापूर परिसरात सापळा रचून पोलिसांनी आरोपी गणेश मोरे याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या कुख्यात आरोपीला जेरबंद केल्याबद्दल राजापूर पोलिसांच्या या कौतुकास्पद व धडक कामगिरीचे सर्वत्र जोरदार स्वागत होत आहे.









