राजापूर:- राजापूर तालुक्यातील तेरवण येथे सामायिक जमिनीतील खैराची झाडे विनापरवाना तोडून चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ४ अज्ञात नेपाळी कामगारांविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सुभाष हरिश्चंद्र सरफरे (वय ६१, रा. भ. सरफरेवाडी) यांची तेरवण येथे सर्वे नं. १५/०१ मध्ये सामायिक जमीन आहे. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास, विशाल विजय सरफरे यांच्याकडे काम करणाऱ्या ४ नेपाळी कामगारांनी फिर्यादीची कोणतीही परवानगी न घेता या जमिनीतील खैराची झाडे तोडली. स्वतःच्या फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने ही ७ झाडे खणून काढून चोरून नेली.
या चोरीबाबत माहिती मिळाल्यानंतर वनपालांमार्फत या जागेचा पंचनामा करण्यात आला. वनविभागाच्या अहवालानुसार, चोरीला गेलेल्या त्या ७ खैराच्या झाडांची एकूण किंमत ६ हजार ५७२ रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
अनेक दिवस उलटूनही झाडांबाबत दाद न मिळाल्याने अखेर सुभाष सरफरे यांनी ७ मार्च रोजी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी रात्री ८ वाजता ४ अज्ञात नेपाळी कामगारांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०३(२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपी हे विशाल सरफरे यांच्याकडे कामाला असल्याचे सांगण्यात आले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.









