दोन संशयितांना अटक
रत्नागिरी:- दापोली कस्टम्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका धाडसी कारवाईत साडेदहा किलोहून अधिक ‘अंबरग्रिस’ (व्हेल माशाची उलटी) जप्त केली असून, याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खेड रेल्वे स्थानकाजवळ १६ जून रोजी पहाटे ही कारवाई करण्यात आली.
काही व्यक्ती ‘द वाईल्ड लाईफ (प्रोटेक्शन) ॲक्ट १९७२’चे उल्लंघन करून अंबरग्रिसची अवैध वाहतूक व विक्री करणार असल्याची गुप्त माहिती दापोली कस्टम्स विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी सापळा रचला. १५ व १६ जूनच्या मध्यरात्री खेड रेल्वे स्थानकाजवळ संशयास्पद हालचाल दिसताच अधिकाऱ्यांनी एका ‘रेनो क्विड’ कारला अडवून तपासणी केली. यावेळी गाडीमध्ये साडेदहा किलोहून अधिक वजनाचे अंबरग्रिस आढळून आले.
सदर पदार्थ हा ‘वाईल्ड लाईफ (प्रोटेक्शन) ॲक्ट १९७२’ नुसार अनुसूची १ (स्पर्म व्हेल) अंतर्गत प्रतिबंधित आहे. त्यामुळे कस्टम्स अधिकाऱ्यांनी हे अंबरग्रिस जप्त करून संबंधित दोन व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यांना खेड येथील माननीय न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना ३० जून २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच, जप्त केलेला मुद्देमाल वन विभागाच्या ताब्यात देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
तस्करीसारख्या बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन कस्टम्स विभागाने केले आहे. तस्करीची माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल आणि नियमानुसार योग्य ते बक्षीस दिले जाईल, असेही विभागाने स्पष्ट केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती नागरिक ८४२११८८७५० या क्रमांकावर (व्हॉट्सॲप किंवा फोनद्वारे) देऊ शकतात.









