खेडात गर्दीचा फायदा घेत महिलेचे सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास

खेड:- खेड बसस्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका वृद्ध महिलेच्या बॅगेतून सुमारे २ लाख ५३ हजार २०० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात २१ डिसेंबर रोजी दुपारी १.५३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सौ. शुभांगी दत्ताराम खापरे (वय ६३ वर्ष, रा. कसबा, लावणवाडी, ता. संगमेश्वर) या १९ डिसेंबर रोजी दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास खेड बसस्थानकावर होत्या. त्या ठिकाणाहून खेड ते मंडणगड जाणाऱ्या एस.टी. बसमध्ये चढत असताना, गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या खांद्याला अडकवलेल्या बॅगेची चेन शिताफीने उघडली. चोरट्याने बॅगेत ठेवलेले दीड तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र (ज्याची किंमत १,५०,००० रुपये आहे) एक सोन्याची गोल मण्यांची माळ सुमारे एक तोळे वजनाची जुनी वापरते (ज्याची किंमत १,००,००० रुपये आहेत )आणि रोक रक्कम ३२०० असा एकूण २,५३,२०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
आपली चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. या घटनेचा अधिक तपास खेड पोलीस करत असून, बसस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे